Barsu Refinery Project : बारसू प्रकरणात शरद पवारांनी घातले लक्ष, मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत म्हणाले.. - शरद पवार
मुंबई, राजापूर जिल्ह्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा प्रखर विरोध लक्षात घेता, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी दोघांमध्ये तब्बल पंधरा मिनिटे चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन, सर्वेक्षण करणार असल्याची ग्वाही शरद पवारांना दिल्याचे समजते. रिफायनरीच्या सर्वेक्षणाला स्थानिकांनी कडाडून विरोध केल्यानंतर पोलिसांनी दडपशाहीने कारवाईला सुरुवात केली. त्यामुळे येथील आंदोलन चिघळले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारसूतील जागेसंदर्भात केंद्राला पत्र पाठवल्याचे समोर आले आहे. सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची यावरुन कोंडी करायचा प्रयत्न सुरु केला आहे. अशातच शरद पवार यांनी बारसू संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून माहिती घेतली. आज सकाळीच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शरद पवारांची भेट घेतली. दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोनवर चर्चा केल्याचे समोर आले आहे. बारसू येथील स्थानिकांवर कोणतेही अत्याचार करु नका. विश्वासात घेऊन त्या जागेचे सर्वेक्षण करा, अशा सूचना पवारांनी मुख्यमंत्र्यांना केल्या.