School Bus Burnt In Fire : विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसने घेतला पेट, चालकाच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण - स्कूल बसने अचानक पेट घेतल्याने मोठी खळबळ
पालघर : विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी जाणाऱ्या स्कूल बसने अचानक पेट घेतल्याने मोठी खळबळ उडाली. ही घटना विरार पश्चिमेतील न्यू विवो महाविद्यालयाजवळ आज सकाळी घडली. चालक आणि वाहकाने तात्काळ विद्यार्थ्यांना बसच्या खाली उतरवल्याने विद्यार्थ्यांना कोणतीही बाधा झाली नाही. मात्र या आगीत ही बस जळून खाक झाली आहे. आज सकाळच्या सुमारास विरार पश्चिमेच्या नॅशनल शाळेची बस विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी शाळेत जात असताना बसमधून अचानक धूर येऊ लागला. त्यामुळे चालक व वाहकाने प्रसंगावधान दाखवून विद्यार्थ्यांना खाली उतरवले. या घटनेची माहिती वसई महापालिकेच्या अग्निशमन पथकाला देण्यात आली. मात्र अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्याआधीच बस जळून खाक झाली होती. अखेर जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही.