Sassoon Hospital Drug Racket : ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा तपास सीआयडीकडं सोपवा; आमदार रवींद्र धंगेकरांची मागणी
Published : Oct 18, 2023, 2:01 PM IST
|Updated : Oct 18, 2023, 3:45 PM IST
पुणे Sassoon Hospital Drug Racket : पुण्यातल्या ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेल्या ड्रग्ज माफिया ललित पाटील यानं काही दिवसांपूर्वी रुग्णालयातून पलायन केलं होतं. त्याच्या या पलायनानंतर ससून हॉस्पिटल तसेच प्रशासनावर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर टीका केली जात होती. ड्रग्ज माफिया ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी चेन्नई येथून अटक केली आहे. यावर आमदार रविंद्र धंगेकर यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. पुणे पोलिसांनी दहा पथक तयार करूनही त्याला पकडलेलं नाही. मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली. याचाच अर्थ असा की, त्याचे आजी-माजी पोलिसांशी लागेबांधे असावेत, असा आरोप आंदार धंगेकर यांनी केला. त्याच्या संपर्कात आजी माजी-पोलीस अधिकारी असून हे पुणे पोलिसांचं अपयश आहे. याचा तपास सीआयडीनं करावा, अशी मागणी यावेळी आमदार धंगेकर यांनी केली आहे. ससून रुग्णालयातून ललित पाटील यानं पलायन केलं ते संशयास्पद होतं. डॉक्टर, पोलीस तसेच तुरुंगातील अधिकारी यांच्या संगनतमतानं त्याचं ड्रग्जचा व्यवहार ससून रुग्णालयातून सुरू होता, असा आरोपही आमदार धंगेकर यांनी केला. ललित पाटील हा रुग्ण म्हणून ससून रुग्णालयात आला होता. मात्र पंचतारांकित हॉटेलप्रमाणं त्याला सुविधा मिळत होत्या. त्यानं पोलिसांना पळून जाण्यासाठी पैसे दिले होते, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्यानं पैसे दिल्यानं पोलिसांनी त्याला पळून जाण्यासाठी मदत केली आहे. त्यामुळे याचा तपास मुंबई किंवा पुणे पोलिसांनी न करता, सीआयडीनं करावा, अशी मागणी यावेळी आमदार धंगेकर यांनी केली आहे.