Sant Tukaram Maharaj palakhi: भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान, भाविकांमध्ये एकच उत्साह; ड्रोन कॅमेऱ्यात दृश्य कैद
पुणे :टाळ-मृदंगाच्या गजरात संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान होत आहे. हे दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाले आहे. 'ज्ञानोबा माऊली-तुकाराम' असा नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर अतिशय प्रसन्न करत आहे. आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका या भक्तिमय वातावरणात आज पंढरपूरकडे प्रस्थान केले. यावेळी भाविकांचा उत्साह, आनंद ओसंडून वाहत होता. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सपत्निक देहू येथील जगद्गुरू तुकाराम महाराज मंदिरात पादुकांचे पुजन आणि आरती केली. यावेळी आमदार महेश लांडगे, खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे, आमदार उमा खापरे, बारामती हाय-टेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार हे पूजेला उपस्थित होते. टाळ-मृदुंगाच्या गजरात पूजेनंतर उपस्थित सर्वजण वारकऱ्यांसह दंग झाले. यावेळी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप नितीन मोरे, संतोष मोरे, पालखी सोहळा प्रमुख माणिक मोरे, विशाल मोरे, भानुदास मोरे, संस्थांचे विश्वस्त संजय मोरे, अजित मोरे हे उपस्थित होते. पालखीने महापूजेनंतर इनामदारवाड्यातील मुक्कामाकडे प्रस्थान केले.