Samruddhi Expressway Accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; रसायन घेऊन जाणारा ट्रक जळून खाक
बुलडाणा : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रक जळून खाक झाला आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री बुलडाणा जिल्ह्यातील राजनी धानोरा या गावाजवळ घडली. समृद्धी महामार्गावरुन केमीकल घेऊन जाणाऱ्या ट्रकचा टायर फुटल्याने अपघात झाला. मात्र अपघातानंतर ट्रकने पेट घेतला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. एका महिन्यापूर्वी बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताने 25 जणांचा बळी घेतला होता. त्यानंतर वाहतूक पोलीस तसेच समृद्धी महामार्ग प्राधिकरणाकडून अपघात रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. त्यानंतर अपघातांना आळा बसल्याचा दावा देखील पोलिसांकडून करण्यात आला होता. मात्र गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता पुन्हा एक भीषण अपघात झाल्यानंतर पुन्हा समृद्धी महामार्गावरील अपघात समोर आले आहेत.