SSC Result 2023 : नापासच होशील! मित्र चिडवायचे, उत्तीर्ण झाला अन् उंटावरून काढली पठ्ठ्याची मिरवणूक - Camel procession of 10th passed students
कोल्हापूर: त्याचं दहावीचं वर्ष; पण हा पठ्ठ्या मित्रांसोबत खेळण्यातच गुंग. त्यामुळे तो उत्तीर्ण होणार की नाही याची घरच्यांसह मित्रांनाही धाकधूक वाटायची. घरच्यांकडून त्याला वारंवार अभ्यास करण्याच्याच सूचना मिळायच्या. अखेर आज दहावीचा निकाल लागला अन् तो 51 टक्के घेऊन उत्तीर्ण झाला. यामुळे मित्रांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी उत्तीर्ण मित्राची चक्क उंटावरून मिरवणूक काढली. कोल्हापुरातील समर्थ सागर जाधव असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. या मिरवणुकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गुलाल उधळून जल्लोष: गंगावेश परिसरात राहणारा समर्थ सागर जाधव हा एस.एम. लोहिया शाळेचा विद्यार्थी. दहावीचे वर्ष असल्यामुळे घरातून आणि मित्रांकडून वारंवार अभ्यास कर, अशा सूचना मिळत होत्या. मात्र, या सूचनांकडे साफ दुर्लक्ष करत तो आपल्याच नादात मित्र आणि सवंगड्यांमध्ये गुंतलेला असायचा. समर्थ दहावी पास होणार की नाही? याची अनेकांना तशी शंकाच होती; मात्र आज दहावीचा निकाल लागला आणि त्याच्या कुटुंबीयांसह मित्रांनीही गुलालाची उधळण करत जल्लोष केला.
त्याची उंटावरून मिरवणूक:समर्थला दहावी पास होणार नाहीस, असे मित्रांनी चिडवले होते. मात्र, निकालानंतर 51 टक्के गुणांसह तो दहावी पास झाल्याचे समजतात मित्रांनी कोल्हापुरातील गंगावेश ते रंकाळा टॉवर या मार्गावर त्याची चक्क उंटावरून मिरवणूक काढून आनंद साजरा केला.
अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन:कोणताही आनंद द्विगुणित करण्याचे कोल्हापूरकरांचे वेगळे तंत्र आहे. आज दहावीचा निकाल लागल्यानंतर शहरात अनेक ठिकाणी रंगपंचमी साजरी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. गल्ली आणि पेटा-पेठांमध्ये दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी गुलालाची मुक्त उधळण करत डॉल्बीवर ठेका धरला. एकूणच कोल्हापुरात दहावीच्या निकालानंतर अनोख सेलिब्रेशन पाहायला मिळाले.
निकालात कोल्हापूरचा दुसरा क्रमांक:दहावीच्या निकालामध्ये यंदाही ९६.७३ टक्क्यांसह कोल्हापूर विभागाने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. यावर्षीही ९७.९७ टक्क्यांसह मुलींनी बाजी मारली आहे. तर मागच्या वर्षी पेक्षा कोल्हापूर विभागाच्या निकालात १.७७ टक्क्यांनी घट झाली आहे.
हेही वाचा: