Sachin Tendulkar Birthday : 'या' गावात सणाप्रमाणेच साजरा केला जातो मास्टर ब्लास्टरचा बर्थडे; पाहा व्हि़डिओ - जागतिक क्रिकेट दीन
सांगली : मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वाढदिवस आज सांगलीतील शिराळा तालुक्यातील औंधी गावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. गावातल्या प्रत्येक घरावर गुढीसोबत बॅट उभारून आणि दारात रांगोळ्या, सडा, भव्य दिंडी, अशा दिमाखात 'तेंडल्या' चित्रपटाच्या टीमने आणि ग्रामस्थांनी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने मास्टर-ब्लास्टर सचिनचा वाढदिवस साजरा केला आहे. मोठ्या धुमधडाक्यामध्ये सचिनचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच या वाढदिवसानिमित्ताने उपस्थित असणारे प्रसिद्ध क्रिकेट समालोचक आणि सचिन तेंडुलकरचे फॅन सुनंदन लेले यांनी सचिनचा वाढदिवस 'जागतिक क्रिकेट दीन' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. ही सचिनच्या फॅनच्या वतीने घोषणा असल्याचेही यावेळी सुनंदन लेले यांनी स्पष्ट केले. गावातील ग्रामपंचायतीसमोर सचिन तेंडुलकरचे भव्य पोस्टर उभे करण्यात आले होते. यावेळी ग्रामपंचायतीच्या इमारतीवर, अंगावर तिरंग्याचे चित्र काढून आणि डोक्यावर तेंडल्याचे टोपी घालून बसलेल्या बच्चे कंपनीने देखील फुलांचा वर्षाव करत सचिनला अनोख्या पद्धतीने अभिष्टचिंतन केले आहे.