Raksha bandhan 2023 : झाडांना इको फ्रेंडली राखी बांधत विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश...
Published : Aug 30, 2023, 10:15 AM IST
नाशिक : निसर्गाचं आणि माणसाचं नातं अतूट आहे. हाच संदेश देत पर्यावरण संरक्षणासाठी नाशिकमधील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनोख्या पध्दतीने राक्षबंधन सण साजरा केला. यावेळी वृक्ष संवर्धनासाठी त्यांनी झाडांना राख्या बांधून पर्यावरण पूरक राक्षबंधन सण साजरा केला. निसर्ग मनुष्याला नेहमीच भरभरून देत असतो, अशावेळी निसर्गावर प्रेम करणं, त्याच रक्षण, संवर्धन करणं मनुष्याचं कर्तव्य आहे. पण अनेकजण निसर्गाचे रक्षण करण्यापेक्षा त्याला हानी पोचवतात. गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या वृक्ष तोडीचे गंभीर परिणाम मनुष्यावर होत आहेत. त्यामुळेच निसर्गाशी आपुलकीचं नात जपण्यासाठी नाशिकमधील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक महाविद्यालयातील डिजिटल मीडिया अँड डेव्हलपमेंट विभागातील विद्यार्थ्यांनी झाडांना पर्यावरण पूरक राख्या बांधत रक्षाबंधन साजरा केला. वृक्ष संवर्धनाची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी या रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या भावना व्यक्त केल्या. झाडांचे संवर्धन झाले पाहिजे हा हेतू डोळ्यापुढे ठेवत विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून राख्या तयार करत झाडांना बांधल्या. आज पर्यावरणाची शपथ घेताना आम्ही झाडांसोबत रक्षाबंधन सण साजरा केला. झाडाच्या खोडाला इको फ्रेंडली राखी बांधली, आणि पुढे भविष्यात आम्ही पर्यावरणासाठी जनजागृती करू असा निश्चय केलाय असं विद्यार्थ्यांनी सांगितलं.