Raksha Bandhan 2023 : पर्यावरणपूरक राख्यांनी साजरा करू रक्षाबंधन.. बांबू पासून बनविलेल्या राख्यांचे किट केले उपलब्ध - इकोफ्रेंडली राख्या
Published : Aug 30, 2023, 12:31 PM IST
ठाणे :रक्षाबंधन सणानिमित्त बांबू पासून बनविलेल्या पर्यावरणपूरक राख्या घेण्याकडे बहिणींचा कल दिसत आहे. या सणामुळे सध्या सर्वच दुकानांमध्ये विविध रंगाच्या आणि डिजाईन्सच्या राख्या दिसत आहेत. प्लास्टिक स्पंज सारख्या राख्यांना बांबूपासून बनलेल्या इकोफ्रेंडली राख्या या उत्तम पर्याय म्हणून उपलब्ध झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या मेळघाट येथील अमरावती लवादाच्या संपूर्ण बांबू केंद्राच्या आदिवासी महिला या राख्या बनवतात. जंगलातील बांबूच्या अत्यंत पातळ पट्ट्या काढून त्याचे क्वीलिंग करून या राख्या बनविल्या जातात. बांबूसोबतच लाकडी मणी आणि दोरा वापरून या राख्या बनविल्या जातात. या राख्यांचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक राख्यांमध्ये विविध झाडाच्या बियादेखील वापरल्या जातात. त्यामुळे जर ही राखी तुटली जरी तरीही या बिया मातीत पडून अंकुरित होतात. त्यापासून नवीन वृक्ष तयार होतात. त्यातच सध्या सर्वच शाळांमध्ये मुलींनी राख्या बनवून मुलांना बांधायची नवीन प्रथा सुरु झाली आहे. यामुळे पर्यावरणाला घातक असलेल्या वस्तू वापरून राख्या बनविण्यापेक्षा बांबू पट्ट्या, लाकडी मणी आणि दोरा असलेले नवीन किट देखील बाजारात आले. त्याला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले. बहीण भावाच्या अतूट प्रेमाचे प्रतीक असलेल्या राख्या विकत घेतानाच पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे.