Vikhe Patil won Rahata APMC : राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीवर बाळासाहेब विखे पाटलांचे वर्चस्व कायम; बाळासाहेब थोरातांच्या पॅनेलला शून्य जागा - Defeat of Balasaheb Thorat
अहमदनगर :राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या जनसेवा मंडळाने तीन बिनविरोध जागांसह एकूण सर्व 18 जागांवर दणदणीत विजय मिळविला. राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या महाविकास आघाडीच्या शेतकरी परिवर्तन मंडळाचा मोठा पराभव केला. मतदान प्रक्रिया शांततेत संपन्न झाली. मतमोजणी संपन्न झाल्यानंतर मतमोजणी स्थळी विखे यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी जल्लोषात गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतिषबाजी केली. राहाता बाजार समितीच्या स्थापनेपासून आजपर्यंत विखे यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्या जनसेवा मंडळाचा विजय निश्चित मानला जात होता. परंतु माजी महसूल मंत्री थोरात यांनी प्रथमच राहाता बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीचा शेतकरी परिवर्तन मंडळाचे उमेदवार उभे करून एक हाती सत्तेला विरोध निर्माण केला. रविवारी सकाळी राहाता बाजार समितीच्या एकूण 18 जागांपैकी 3 बिनविरोध जागा झाल्यानंतर उर्वरित 15 जागांसाठी मतदानास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. सकाळपासून मतदान केंद्रावर मोठी गर्दी होती. मतदान प्रक्रिया पूर्ण झाली त्यावेळी 98 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला केवळ 28 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला नसल्याचे समजते.