पतीच्या निधनानंतर खचून न जाता राधानं गाठलं यशाचं शिखर; बीड ते थायलंड अविस्मरणीय प्रवास, पाहा VIDEO - Beed To Thailand
Published : Jan 6, 2024, 10:56 PM IST
बीड Radha Tambe Yoga Story: खरंतर आज प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. प्रत्येक क्षेत्रातील यशाचं शिखर महिलांनी गाठलंय. राधा तांबे यांचं वयाच्या विसाव्या वर्षी लग्न झालं. त्यानंतर त्यांना दोन मुलंही झाली. मात्र नियतीला हा सुखी संसार मान्य नव्हता. 2015 साली पतीचं अपघाती निधन झालं. यानंतर त्या पतीच्या दुःखात इतक्या बुडाल्या की, अनेक आजार देखील त्यांना झाले. पदरात दोन चिमुकली मुलं, मनात अतोनात दुःख होतं. मात्र, दुःखातून सावरत मुलांचा संभाळ करत त्यांचा बीड ते थायलंड असा अविस्मरणीय प्रवास घडला आहे.
थायलंडमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी झाली निवड : कुणीतरी निमित्त झालं अन् आयुष्य जगण्याला नवं कारण राधा यांना मिळालं. आधी स्वत: शिकत आणि नंतर इतरांना शिकवत योगसाधनेच्या या प्रवासाला सुरुवात झाली. नागपूरमध्ये झालेल्या 35 व्या योगासन स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली. या स्पर्धेत त्यांचा तिसरा क्रमांक आला. या स्पर्धेतून त्यांना दुसरी संधी मिळाली. थायलंडमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. सुरुवातीला स्वतः योगासनं करून त्यांनी स्वतःचा लठ्ठपणा दूर केला. मात्र यातून चिमुकल्या मुलांनाही त्यांनी योगासनं शिकवण्यास सुरुवात केली. त्यांनी स्वतःच्याच नावाने 'राधिका ऍडव्हान्स योगा बॅचेस' सुरू केल्या. आतापर्यंत पाच हजाराहून अधिक लहान मुलांपासून साठ वर्षांच्या व्यक्तीपर्यंत त्यांनी योग शिकवून त्यांना निरोगी आरोग्य दिलं आहे.
संघर्षातून एक नवी वाट : आज त्या दोन मुलांनसोबत एकट्या राहतात. धाडस, जिद्द आणि चिकाटी या सगळ्या गोष्टी त्यांनी उराशी बाळल्या. आज मुलांच्या शिक्षणासह आपलं स्वतःचं आयुष्यही त्या मोठ्या हिमतीनं सांभाळलं आहे. मात्र संघर्ष कुणाला चुकला नाही आणि या संघर्षातून प्रत्येकालाच एक नवी वाट मिळते हे या कहाणीतून पाहावयास मिळतंय. योग शिकत आणि शिकवत साता समुद्रा पलीकडे जाणाऱ्या त्या जिल्ह्यातील या पहिल्या महिला ठरल्या आहेत. राधा तांबेंच्या धीराचं, कामाचं अन् जिद्दीचं कौतुक करावं तितकं थोडचं. असंच यश पदरी पडत राहो याच त्यांना शुभेच्छा.