Pankaja Munde Challenges BJP: 'आता निवडणुका घ्याच, तुमच्या आणि माझ्या संघर्षाला सोन्याचे दिवस येतील' - पंकजा मुंडेंचे भाजपला आव्हान
बीड: शिंदे सरकार निवडणुकांपासून लांब पळत असल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेते करत असतानाच, आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी, आता निवडणुका घ्याच..असे आव्हान दिले आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, कार्यकर्त्यांनो कामाला लागा..तुमच्या आणि माझ्या संघर्षाला सोन्याचे दिवस येतील. आपण आपला हक्क हात आपटून घेऊ..असे म्हणत पंकजा मुंडे यांनी निवडणुकीसाठी वज्रमूठ आवळली आहे.
धनंजय मुंडेंवरही टीका:मठातला एखादा माणूस जवळ घेऊन लोकं जवळ आले, असा अविर्भाव आणू शकत नाही असे म्हणत बीडच्या गहनीनाथ गडावर आलेल्या देवेंद्र फडणवीसांवर पंकजा मुंडे यांनी नाव न घेता निशाणा साधलाय. त्या बीडच्या अंबाजोगाई येथे भाजप कार्यकर्ता बैठकीत बोलत होत्या. त्या पुढे बोलताना म्हणाल्या, की मुंडे साहेबासारखा करणं, त्यांची कॉपी करणे, याच्याने मुंडे साहेब होत नाही. विचाराचे अनुकरण करून वागणं म्हणजे मुंडे साहेब होणे होय, असे म्हणत नाव न घेता भाऊ धनंजय मुंडेंवर देखील पंकजा मुंडे यांनी निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, राजकारण धर्माने करा. परंतु, धर्माचे राजकारण करू नका, फंड निधी यापेक्षा पुढे जाऊन राजकारण आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
गावागावात युद्ध तयार झालंय: त्यापुढे म्हणाल्या, की आता निवडणुका घ्याच... आता आला आमचा ऊसतोड कामगार वापस. आता फिरू द्या आम्हाला उन्हातान्हात.. जे होईल ते होईल.. 'दूध का दूध पाणी का पाणी' निवडून येईल, काय पडतील काय, आम्ही म्हणत नाहीत की, आम्हीच निवडून येऊ. मात्र निवडणुकाच होईना.. नगरपालिका होत नाही.. जिल्हा परिषद होत नाहीत.. मात्र ग्रामपंचायत होत आहेत.. मला असे वाटते की, गावागावात युद्ध तयार झालंय, मात्र पुढे नाही.. असे म्हणत निवडणुकांवरून पंकजा मुंडे यांनी भाजपचेच कान टोचले आहेत.
तर आता लागा कामाला:माझ्या आणि तुमच्या संघर्षाला सोन्याचे दिवस येतील..आता आपण हात आपटून आपला हक्क घेऊ. येणाऱ्या निवडणुकीला ताकदीने सामोरे जा. मी तुमच्या पाठीशी आहे. जनतेना मला दिलेले कर्ज हे गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करून दिले. पालकमंत्री कुणीही असले तरी मी तुमची पालक आहे, अशी भावनिक साद देखील यावेळी पंकजा मुंडे यांनी आलेल्या कार्यकर्त्यांना घातली.