युतीसाठी अजून कोणाचं आमंत्रण नाही, रासप लोकसभा स्वबळावर लढवण्याच्या तयारीत - महादेव जानकर
Published : Jan 11, 2024, 9:29 PM IST
शिर्डी (अहमदनगर) Mahadev Jankar : अद्याप युती संदर्भात कोणाचाही प्रस्ताव न आल्यानं रासप स्वबळावर लोकसभा निवडणूक (lok Sabha Election) लढवणार असल्याचा इशारा माजी मंत्री महादेव जानकर यांनी दिलाय. लोकसभा निवडणुकीकरीता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. जन स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून माजी मंत्री महादेव जानकर यांच्या उपस्थितीत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील बूथनिहाय सर्व पदाधिकाऱ्यांची श्रीरामपूर येथे आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीकरीत सर्वांनी कामाला लागण्याचे आदेश जानकरांनी दिले.
रासप लोकसभेच्या सर्व जागा स्वबळावर लढवणार : लोकसभा निवडणूक सोबत लढविण्यासाठी ना एनडीएकडून ना इंडियाकडूनही कोणताही प्रस्ताव आलं नसल्यानं, महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व जागा रासप स्वबळावर लढवणार आहे. नगर दक्षिणेतून रवींद्र कोठारी लोकसभा निवडणुकी लढविणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तसेच शिर्डी लोकसभेच्या जागेकरिता अनेकजण संपर्कात आहेत. शिर्डी लोकसभा निवडणुकीत रासप महत्वाची भूमिका पार पाडेल, असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केलाय.