Amravati News: दोन राज्यांच्या अगदी सीमेवर असलेल्या, बुरहानपूर गावाची व्यथा
अमरावती :मेळघाटातील बुरहानपूर हे गाव महाराष्ट्रातील परतवाडा शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर आहे. बुऱ्हाणपूर या गावातील आदिवासी बांधवांना बाजारासाठी परतवाडा अगदी जवळ आहे. मात्र आधार कार्ड, शाळेचे दाखले, जातीचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड असे विविध शासकीय कागदपत्र तयार करण्यासाठी, त्यांना 40 किलोमीटर लांब असणाऱ्या मध्य प्रदेशातील भैसदेही या तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. तसेच जिल्हा पातळीवरील कामासाठी बैतुलशिवाय पर्याय नाही. दुर्दैव म्हणजे भैंसदेही असो किंवा बैतूल येथील शासकीय अधिकारी गावात येऊनही कधीही पाहणी केली नाही. यामुळे गावाची अवस्था अतिशय वाईट असल्याची व्यथा ग्रामस्थांनी मांडली. आज देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली. मात्र आमच्या गावात अद्यापही वीज नाही, गावात पक्का रस्ता नाही, पाण्याची देखील व्यवस्था नाही. गावात विहीर व्हावी, यासाठी बैतूल येथे जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना अनेकदा निवेदन सादर केले. आजोबांपासून अनेकदा गावातील समस्या सोडविण्यासाठी बैतूलला जाऊन मागणी केली. मात्र, वडील आणि आजोबा या जगातून निघून गेले. अजूनही आमच्या गावाकडे मध्य प्रदेश सरकारने लक्ष दिले नाही असे, बुरानपूर येथील आदिवासी बांधव सांगतात. तसेच आम्हाला गावात कायमस्वरूपी वीज मिळावी यासाठी दोन्ही राज्यांनी या गावात माणसे राहतात याचा विचार करावा, अशी मागणी देखील आदिवासी बांधवांकडून केली जात आहे.