Samriddhi Highway : समृद्धी महामार्गावर महामृत्युंजय यंत्राची स्थापना करणे भोवले; एकावर जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा
बुलडाणा : समृद्धी महामार्गावर महामृत्युंजय यंत्राची स्थापना करणे एकाला चांगलेच महागात पडले आहे. समृद्धी महामार्गावर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 25 जणांच्या आत्म्यांना शांती लाभण्यासाठी महामृत्युंजय यंत्राची स्थापना निलेश आढाव यांनी केली होती. त्यामुळे त्यांच्याविरोधात सिंदखेड राजा पोलिसात जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल समृद्धी महामार्गावर अपघात स्थळी सिंदखेडराजा येथे अखिल भारतीय स्वामी समर्थ अध्यात्मिक संस्था दिंडोरीकडून महामृत्युंजय यंत्राची स्थापना करण्यात आली होती. तसेच महामृत्युंजय मंत्राचा जप देखील करण्यात आला होता. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. महामृत्युंजय यंत्राची स्थापना केल्याने मृतात्म्यास शांती लाभते, असा दावा निलेश आढाव नामक व्यक्तीने केला होता. त्यामुळे त्यांच्याविरोधात जादूटोणाविरोधी कायद्यानुसार अधिनीयम 2013 कलम 2, 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.