Maharashtra Political Crisis : जे गेले ते स्वेच्छेने गेले, राज्यातील जनता शरद पवारांसोबत - महेश तपासे - अजित पवार
पुणे - अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी 30 ते 40 आमदारांनी शिंदे सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यापैकी नऊ आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यासह अजित पवार पुन्हा एकदा सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवार यांच्या बंडानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली. अजित पवार यांची भूमिका ही पक्षाची भूमिका नसल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले. अजित पवार यांच्या भूमिकेवर पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. जे कोणी आज गेले ते स्वेच्छेने गेले आहे. पवार साहेबांनी कोणालाही थांबवलेले नाही. आम्हाला माहीत आहे की राज्यातील जनता ही पवार साहेबांच्याच बाजूने असणार आहे, असे महेश तपासे यावेळी म्हणाले.