Sharad Pawar News: स्पष्ट सांगितल्यानंतर फाटे फोडण्याचे अधिकार तुम्हाला नाही-शरद पवार - Sharad Pawar reaction on Ajit Pawar
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज सासवड दौऱ्यावर आहेत. त्यांनी सासवड येथील कार्यक्रमानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सध्या न्यायालयात महाराष्ट्रातील 16 आमदारांच्या पात्रतेचा मुद्दा प्रलंबित आहे. हे प्रकरण आणि त्याचा निकाल शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात लागण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. न्यायालयाचा निकाल शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात गेल्यास महाराष्ट्रात सध्या अस्तित्व असलेले शिंदे फडणवीस सरकार कोसळण्याची शक्यता आहे. अश्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज आमदारांची बैठक बोलावली आहे, असे सांगितले जात आहे. यावर शरद पवारांनी त्यांची भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, जी काही चर्चा तुमच्या मनात आहे, ती चर्चा आमच्या कुणाच्याही मनात नाही. या चर्चेला अजिबात महत्त्व नाही. कोणीतरी अफवा पसरवत आहे. ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी आणि समविचारी सहकारी पक्ष मिळून शक्तिशाली बनण्याचे प्रयत्न सुरू आहे. एकदा स्पष्ट सांगितल्यानंतर फाटे फोडण्याचे अधिकार तुम्हाला नाही. सोमवारी वेणुगोपाल आले होते. दिल्लीत होऊ घातलेल्या विरोधकांच्या बैठकीबाबत त्यांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. माझे बोलणे आधीच झाले होते. त्यामुळे मला भेटण्याची गरज नव्हती. आम्ही दिल्लीला बैठकीसाठी जाणार आहोत. विरोधक म्हणून सामूहिक कार्यक्रमावर चर्चा करणार आहोत, असे देखील यावेळी पवार म्हणाले.