Nilesh Lankes: कांद्याचे भाव घसरल्याने, नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन - onion prices
अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगर- पुणे महामार्गावर सुपा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांची उपस्थिती या आंदोलनात असल्याने, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसह कार्यकर्ते या आंदोलनात उपस्थित होते. सरकारच्या कांदा धोरणाचा राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात आला. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कांद्याच्या भावात घसरण झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्याला कांदा उत्पादनासाठी लागणारा खर्च, आडत सगळ्याचा खर्च जाऊन शेतकऱ्याच्या हातात काही पैसे मिळणे अपेक्षित आहे. परंतु काही दिवसांपूर्वी कांदा उत्पादक शेतकऱ्याला दोन रुपयाचा चेक दिला गेला. त्यानंतर अनेक ठिकाणी कांद्याचे भाव गडगडले त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. आज अहमदनगर पुणे महामार्गावर सुपा येथे सरकारचे कांदा प्रश्नी लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांच्यासह शेतकरी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन सुरू केले. दोन्ही बाजूने वाहनाच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे, असे अनेक वेळा सांगण्यात आले परंतु त्याची अंमलबजावणी कधी होईल याकडेच शेतकरी आशेने पाहत आहे.