Nanded Bus Accident: स्टेअरींगची बेअरींग तुटल्याने धावती बस उलटली, 35 प्रवासी जखमी - बसचा अपघात
नांदेड :जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात एसटी महामंडळाच्या बसचा अपघात झाला आहे. कुंडलवाडीहून रावधानोराकडे जाणारी एसटी महामंडळाची बस उलटली. हा अपघात 8 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडला आहे. या बसमध्ये 35 प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बसमध्ये प्रवास करणारे प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. बसच्या स्टेअरींगची बेअरींग तुटल्याने बस थेट रस्ताखाली पलटली. अचानक झालेल्या या घटनेमुळे बसमधील प्रवाशांची काहीवेळ धावपळ झाली. हा अपघात पाहताच सिराज खाजी व त्यांचे कामगार अशोक ईरलावार, मुस्ताक डौर, आसीफ अजार्पूर, बालाजी ईरलावार, वड्डन्ना धोबी, अशोक पाळेकर यांनी मदतासाठी धाव घेतली. पिंपळगाव व हज्जापूर येथील प्रवाशांना सुखरूप बसमधून बाहेर काढले. तर बिलोली आगार प्रमुख सुभाष पवार, सह पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले यांनी घटनास्थळी पोहचून माहिती घेतली. रौफ खुरेशी यांनी चालकास व प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यास पुढाकार घेतला.