Nana Patole Reaction : देशातील भाजपाला आली आहे सत्तेची मस्ती, नाना पटोले यांचा घणाघात - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
भंडारा : देशातील भाजपाला सत्तेची मस्ती आलेली आहे, बीजेपी संवेदनशील नाही, भाजपाला मनुवाद चालवायचा आहे का? असे अनेक घणाघाती आरोप, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. मणिपूरमध्ये सुरू असलेले हिंसाचार आणि महिलांवर झालेले अत्याचार याविषयी बोलताना त्यांनी हे आरोप केले. ते आज भंडारा येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. मागील 80 दिवसांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर देशाचे पंतप्रधान मौन ठेवून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सतत विदेश दौऱ्यावर असतात. त्यामुळे एवढ्या संवेदनशील विषयावर त्यांना भाष्य करायला वेळ नाही. नुकत्याच महिलांवर झालेल्या अत्याचारानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर हा अत्याचार पसरला. त्यानंतर जागतिक स्तरावर निषेध झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीडियासमोर येऊन दोन शब्द बोलून औपचारिकता पूर्ण केली. तसेच मीडियाच्या प्रश्नांचे उत्तर न देता निघून गेले. मणिपूरच्या हिंसाचारावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी भूमिका मांडल्यानंतर भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी त्यांच्यावर टीका करून हे सिद्ध केले की, त्यांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही. ही न्यायव्यवस्था मोडून काढण्याचा प्रकार भाजपातर्फे केला जात आहे. हा एकप्रकारे न्यायव्यवस्थेचा अपमान आहे. जे पंतप्रधान आतापर्यंत मणिपूरसारख्या हिंसाचारात मौन होते, ज्यांना लोकशाही मान्य नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा करावी असेही त्यांनी यावेळी म्हटले.