House Collapse In Nagpur : घर कोसळून बाप लेकीचा मृत्यू; कोळसा खाणीतील स्फोटाच्या हादऱ्यानं पडलं घर, नागरिकांचा आरोप - कोळसा खाणीत ब्लास्टिंग
Published : Aug 29, 2023, 7:19 AM IST
|Updated : Aug 29, 2023, 10:22 AM IST
नागपूर : कांदरी - कन्हान येथं घर कोसळून बाप लेकीचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. कमलेश गजानन कोटेकर आणि यादवी कोटेकर असं मृत्यू झालेल्या बाप लेकीचं नाव आहे. कोळसा खाणीत होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे अनेक घराच्या भिंतीना तडे गेले आहेत. त्यातचं रविवारी दुपारी कोसळा खाणीत ब्लास्टिंग झाल्यानंतर बसलेल्या हादऱ्यांमुळे संपूर्ण घर कोसळल्याचा आरोप नागरिकांनी केला. या घटनेत बापलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा गंभीर आरोपही स्थानिक नागरिकांनी केला आहे. मृतांमध्ये कमलेश गजानन कोटेकर आणि त्यांची 5 वर्षीय मुलगी यादवी कोटेकर यांचा समावेश आहे. घटना घडल्यानंतर स्थानिकांनी मदतीसाठी धावाधाव केली. मात्र, गजानन आणि यादवीला वाचवता आलं नाही. कांदरी या परिसरातील कोळसा काढण्यासाठी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडकडून (वेकोली) रोज कोळसा खाणीत ब्लास्टिंग करण्यात येते. त्यामुळे अनेकांचे जीव धोक्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तात्काळ ब्लास्टिंग बंद करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.