काळाचौकी परिसरातील बीएमसी स्कूलमध्ये भीषण आग, पाहा व्हिडिओ - Massive fire
Published : Jan 15, 2024, 10:29 AM IST
|Updated : Jan 15, 2024, 11:19 AM IST
मुंबई Mumbai Kala Chowki Fire :मुंबईच्या लालबाग काळाचौकी मिंट कॉलनी परिसरातील बीएमसीच्या साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूलमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. सिलिंडरच्या आठ स्फोटांचे आवाज आल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. मात्र, सिलेंडरच्या स्फोटामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. तसंच आगीमुळं परिसरात धुराचे लोट पसरले असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण बघायला मिळत आहे. दरम्यान, कोरोनाकाळात रुग्णासाठी या शाळेचा वापर करण्यात आला होता. तसंच मागील तीन वर्षांपासून ही शाळा बंद आहे. त्यामुळं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी प्रतिक्रिया देत ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी म्हणाले की, या शाळेत गोर गरीब विद्यार्थी शिकत होते. आम्ही वारंवार ही शाळा सुरू करण्याची मागणी महापालिकेकडे केली मात्र पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं. तसंच पुनर्विकासाच्या नावाखाली सदरची शाळा बंद करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.