Movement For District : जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी अंबाजोगाईकर रस्त्यावर...! - अंबाजोगाई जिल्हा जाहीर करावा
अंबाजोगाई : बीड जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र अंबाजोगाई जिल्हा जाहीर करावा, अशी मागणी 35 वर्षापासून आहे. जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी आज क्रांती दिनी अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चव्हाण चौकात आंदोलन करण्यात आले. मशाल पेटवून आंदोलनाला सुरुवात झाली. हे आंदोलन दोन तास चालले. अंबाजोगाई शहरात जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय, स्वतंत्र आरटीओ यासह विविध कार्यालये आहेत. त्यामुळे अंबाजोगाई जिल्ह्याची निर्मिती करण्याची मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे. आजच्या आंदोलनाच्या विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक सहभागी झाले होते.
आंबेजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष विजयकुमार जाजू यांच्या पुढाकाराने 1988 साली हे आंदोलन उभा राहिले. त्यावेळी ग्रामविकास मंत्री पंडितराव दौंड तर शरद पवार हे मुख्यमंत्री होते. केज मतदार संघाच्या आमदार विमलताई मुंदडा यांनी 1990 या कार्य काळामध्ये आंबेजोगाई जिल्हा व्हावा याच्यासाठी पुन्हा प्रयत्न केले विमलताई मुंदडा 1992 मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या आणि पुन्हा एकदा आंबेजोगाई जिल्हा निर्मितीसाठी जोर वाढला. त्यानंतर तब्बल दोन टर्म विमल मुंदडा यांनी भाजपच्या तिकिटावर आमदारकी मिळवली.
त्या नंतर राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत पुन्हा एकदा विमल मुंदडा या राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आल्या आणि त्यावेळी ही मोठे आंदोलन झाले. त्यानंतर 15 ऑगस्ट 2010 मध्ये तर उग्र आंदोलन झाले त्यावेळी शासकीय गाड्यांची जाळपोळही झाली होती. तेव्हा गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते. मधे विलासराव देशमुख यांनीही अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. पण नंतर हिंगोली, वाशिम या नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली. परंतु आंबेजोगाई जिल्ह्याची निर्मिती रखडली. आता पुन्हा ही मागणी जोर धरत आहे.