Fire In Buldana : आगीनंतर हे आमदार झाले अग्नीवीर, आग विझवण्यासाठी लावली जीवाची बाजी
बुलडाणा : लोकप्रतिनिधी म्हटले की सर्वसामान्यांच्या सुख दुःखात जाणे अपेक्षित असते. पण त्यापेक्षाही पुढे जाऊन आपली आगळीवेगळी छाप निर्माण करणे हे बुलडाण्यातील संजय गायकवाड यांना चांगलेच जमते. शहरात आग लागल्यानंतर संजय गायकवाड यांनी रात्री घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी जीवाची बाजी लावली. त्याबाबत आमदार संजय गायकवाड यांचे चांगलेच कौतुक होत आहे. आपल्या शब्दांच्या बाणाने विरोधकांना नेहमी सळोकी पळो करून सोडणारे आणि विशेषता संजय राऊत यांना नेहमी आपल्या रडावर ठेवणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे नेहमी चर्चेत असतात. कोणत्याही गोष्टीची परवा न करता रोखठोक हा त्यांचा नित्याचा स्वभाव आहे. पण जेव्हा बुलडाण्यातील प्रभाग क्रमांक ९ सोळंके लेआउटमध्ये गजानन बांबल यांच्या घराला शॉर्टसर्किटने आग लागली, तेव्हा रात्री साडेनऊ वाजले होते. आग अधिकाधिक भडकत होती. तेव्हा आमदार संजय गायकवाड एका लग्नावरून परत येत असताना ही बाब त्यांच्या कानावर गेली. त्यांनी थेट नगरपालिकेत जाऊन अग्निशमन दलाची गाडी काढली. त्यात बसून ते घटनास्थळी दाखल झाले. भडकलेल्या आगीची परवा न करता त्यांनी प्रयत्नाची पराकाष्टा करत ती आटोक्यात आणली. यामुळे कुटुंबावर फार मोठे हानी टळली. मात्र एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती असून त्यावर तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्नीवीर म्हणून धावून गेलेले संजय गायकवाड यांच्यातील वेगळे रूप बघायला मिळाले.