Rohit Pawar : युवा संघर्ष यात्रेला सुरुवात; आमदार रोहित पवार यांच्या आई आणि पत्नी झाल्या भावूक... - दिवाळी
Published : Oct 24, 2023, 6:39 PM IST
पुणे Rohit Pawar: युवकांचे विविध प्रश्न हाती घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आज युवा संघर्ष यात्रेला सुरूवात झाली आहे. युवा संघर्ष यात्रेचा शुभारंभ (Yuva Sangharsh Yatra) म्हणून आज रोहित पवार यांनी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केलं. तसंच त्यानंतर महात्मा फुले वाडा, लाल महाल येथे अभिवादन करून युवा संघर्ष यात्रेला सुरूवात केली. यावेळी लाल महाल ते टिळक स्मारकपर्यंत पायी यात्रा काढण्यात आली. तिथं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी तरुणांना मार्गदर्शन केलं. यावेळी या मार्गदर्शन सभेला मोठ्या संख्येने तरुण तसंच विविध पक्षीय लोक उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे यावेळी रोहित पवार यांचे कुटुंब देखील उपस्थित होते. उद्यापासून प्रामुख्याने तुळापूर येथून या पायी यात्रेला सुरूवात होणार आहे. एकूण 800 किलोमीटर आणि 42 दिवस अशी ही पदयात्रा असणार आहे. पवार कुटुंबात पहिल्यांदा आमदार रोहित पवार हे सहकुटुंब पदयात्रेत दिवाळी (Diwali) साजरी करणार आहेत. एकूणच या यात्रेच्या बाबतीत रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार आणि पत्नी कुंती पवार यांच्याशी बातचीत केली असता त्या भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.