Fish Died In Barva: नीलकंठेश्वर बारवमध्ये विषारी द्रव्य टाकल्याने लाखो माशांचा मृत्यू
बुलढाणा : जिल्ह्यातील सिंदखेडराजा शहरात ऐतिहासिक निळकंठेश्वर मंदिरासमोर असलेल्या पाण्याच्या बारवमध्ये अज्ञात समाजकंटकाने विषारी द्रव्य टाकल्याने हजारो मासे मृत पावले आहेत. मोठ्या संख्येत मासे मृत पावल्याने माशांचा खच पाण्यावर तरंगताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे ज्या अज्ञात समाजकंटकाने हे कृत्य केले आहे, त्याचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. ऐतिहासिक पुष्प करणी बारवेतील हजारो मासे मृत अवस्थेत आढळले. शहरातील सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण प्रेमींनी घटनास्थळी धाव घेऊन मासे बारवे बाहेर काढण्यास मदत केली. माशांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला याचा शोध घेतला पाहिजे. पुष्पकर्णी बारवा येथील ऐतिहासिक ठेवा आहे. या बारवेला निळकंठेश्वर बारव म्हणून देखील ओळखले जाते. सध्या या बारवेत मुबलक पाणी आहे. यात मोठ्या प्रमाणावर मासे होते. हिरवट रंगाचे पाणी असलेल्या बारवेतील माशांचा अचानक झालेला मृत्यू शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान राज्य पुरातत्त्व विभागाने याबाबत चौकशी करून विषप्रयोग झाला किंवा प्रदूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाला. याचा खुलासा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.