मनोरुग्ण चढला रेल्वे स्थानकातील विजेच्या खांबावर; दोन तास वाहतूक ठप्प, रेल्वे प्रशासनाची तारांबळ - दोन तास वाहतूक ठप्प
Published : Nov 28, 2023, 2:06 PM IST
|Updated : Nov 28, 2023, 3:36 PM IST
नंदुरबार : नंदुरबार रेल्वे स्थानकावर एका मनोरुग्णामुळं ठप्प झालेली रेल्वे वाहतूक तब्बल दोन तासानंतर सुरळीत सुरू झाली. मनोरुग्ण व्यक्ती रेल्वेच्या मुख्य वीज वितरण वाहिनीवर चढल्यामुळं वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. वीज पुरवठा खंडित असल्यामुळं रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. यादरम्यान मुंबई-दानापूर एक्सप्रेस आणि नवजीवन एक्सप्रेस सुमारे दोन तास थांबवण्यात आल्या होत्या. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यानं हजारो प्रवाशांचे हाल झाले. शर्थीचे प्रयत्न करून मनोरुग्णाला रेल्वे प्रशासनानं वीज वाहिनी खांबावरुन दुपारी बारा वाजता खाली उतरवलं आहे. दोन तासानंतर रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आलेली आहे. मात्र सुरुवातीला मनोरुग्ण ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यानं प्रशासनाची काही काळ चांगलीच तारांबळ उडल्याचं दिसून आलं. अखेर डिझेल इंजिनच्या साह्यानं मनोरुग्णाला खाली उतरविण्यास रेल्वे प्रशासनाला यश आलं.