Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील तुम्ही पाणी प्यावं आणि उपोषण सुरू ठेवावं; संभाजीराजेंचा फोन - मनोज जरांगे पाटील उपोषण
Published : Oct 29, 2023, 3:58 PM IST
पुणे Maratha Reservation :मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले आहेत. तर अनेक ठिकाणी राज्यातील मंत्र्यांना गावबंदी तसेच काळे झेंडे दाखवले जात आहे. आजपासून ठिकठिकाणी उपोषण करण्यात येत आहे. अशातच मराठा आंदोलनावर संभाजीराजेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Sambhaji Raje on Manoj Jarange Patil) ते म्हणाले की, मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. त्यांच्या तब्येतीची मला काळजी आहे. त्यामुळे मी स्वतः त्यांना भेटून आलो होतो. पण आता त्यांची तब्येत खालावत आहे. माझं त्यांना आवाहन आहे की, त्यांनी पाणी प्यावं आणि आमरण उपोषण सुरू ठेवावं. (Manoj Jarange Patil hunger strike) तसेच पुढील सर्व कार्यक्रम रद्द केले असल्याचं यावेळी संभाजीराजेंनी जाहीर केलं.
युवकांनी आत्महत्या करू नये : यावेळी संभाजीराजे म्हणाले की, आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा युवक आत्महत्या करत आहेत, हे दुर्दैवी आहे. या घटनांमुळे मी व्यथित झालो आहे. मी मराठा समाज बांधवांना पुन्हा एकदा हात जोडून कळकळीची विनंती करतो की, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो आहोत. संघर्ष करून एखादी गोष्ट मिळवणे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितले आहे. युवकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये. आरक्षणाची लढाई आपण लढत आहोत, आणि पुढे आरक्षण मिळवून देखील दाखवू.