Maratha Reservation : आघाडी सरकारच्या काळात तुम्हीच मराठा आरक्षण घालवलं; 'या' नेत्यानं शरद पवारांना सुनावलं - Maratha reservation in 2004
Published : Sep 8, 2023, 6:49 AM IST
|Updated : Sep 8, 2023, 4:56 PM IST
सातारा : '२००४ मध्ये आघाडी सरकारच्या काळात शरद पवारांनीच मराठ्यांचं आरक्षण घालवलं', असा गंभीर आरोप रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केला. 'मराठा आरक्षणाबाबत एवढंच वाटत असेल तर आझाद मैदानावर उपोषण सुरू करा', असं आव्हानही त्यांनी शरद पवारांना दिलं. साताऱ्यात माध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, मराठा समाजाच्या प्रस्थापित नेत्यांनीच मराठा समाजाची माती केली. २००४ साली बापट आयोग कोणी स्थापन केला? बापट आयोगानं आरक्षण देता येणार नाही, असं सांगितलं. तरीही सरकारनं हा आयोग का स्वीकारला? असा सवालही खोत यांनी केला. मनोज जरांगे पाटलांची तब्बेत खराब आहे. त्यांना थोडी विश्रांती द्या. देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत, म्हणून त्यांच्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न विरोधक करत असल्याचा आरोपही खोत यांनी यावेळी केला.