Maharashtra Din 2023: आज महाराष्ट्राचा 63 वा स्थापना दिन; उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र चळवळीसाठी बलिदान दिलेल्यांना वाहिली श्रद्धांजली - उद्धव ठाकरे
मुंबई : आज महाराष्ट्राचा 63 वा स्थापना दिन आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत आणि इतर लोकांनी हुतात्मा चौकात संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी बलिदान दिलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष पाहावयास मिळाला. 1 मे 1960 रोजी मुंबई राज्याचे विभाजन झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. या स्मरणार्थ दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या स्मरणार्थ आणि वेगळ्या राज्याच्या लढ्याची आठवण म्हणून महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. 1 मे हा जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र राज्यासाठी हा दिवस ऐतिहासिक महत्त्वाचा आहे. कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्याचा हा एक दिवस आहे. यामुळे आपल्या राज्यासाठी दिलेल्या बलिदानाची जाणीव आपल्या नव्या पिढीला राहील, त्यासाठी हा दिवस साजरा केला जातो, असे अरविंद सावंत म्हणाले.