Kharghar Heatstroke Deaths: महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील मृतांचा आकडा १४ वर पोहोचला, जितेंद्र आव्हाडांनी शेअर केलेल्या व्हिडिओमुळे नवा वाद - खारघर उष्माघात मृत्यू अपडेट
ठाणे- महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील मृत्यू झालेल्या श्री सेवकांची संख्या वाढून १४ वर पोहोचली आहे. दुसरीकडे या घटनेत उष्माघाताने मृत्यू झाले की चेंगराचेंगरीने मृत्यू झाले असा सवाल राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यांनी व्हायरल झालेला व्हिडिओ शेअर करत हा व्हिडिओ कुठला आहे, असा प्रश्न उपस्थित केला आहे. व्हिडिओमध्ये चेंगराचेंगरी होऊन मृत्यूमुखी पडलेल्या महिला दिसत आहे. एका महिलेचे प्राण वाचविण्यासाठी कृत्रिम पद्धतीने श्वास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे महाराष्ट्र शासन असे लिहिलेली रुग्णवाहिका घटनास्थळी आलेली दिसत आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया देत घटनेची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली आहे. घटनेच्या दिवशीच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चेंगराचेंगरीने काही जणांचे मृत्यू झाल्याची माहिती मिळत असल्याचे म्हटले होते. तसेच साडेतेरा कोटी खर्चूनही कार्यक्रमाचे नियोजन ढिसाळ झाल्याची टीका देखील केली होती. खारघर दुर्घटनेप्रकरणात सरकारवर मनुष्यवध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. तसेच दुर्घटनेतील मृताच्या वारशांना प्रत्येकी २० लाख तर जखमींना ५ लाखांची मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या सत्यतेबाबत ईटीव्ही भारत कोणतीही पुष्टी देत नाही.