Political Crisis : विकासकामांसाठी मंत्री मुश्रीफ भाजपसोबत; कागल मतदार संघातील सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया - Hasan Mushrif with Bjp
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राष्ट्रवादीतील फुटीर गट अजित पवार असे दोन प्रवाह राष्ट्रवादी तयार झाले. राज्याच्या राजकारणात संभ्रमावस्था कायम असल्याने गाव पातळीवरील कार्यकर्त्याची मात्र घालमेल होत आहे. ज्या काही मोजक्या आमदारांसह अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची आणि उर्वरित आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली, यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव नाव असलेले कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांचा समावेश आहे. दोन दिवसांपासून राजकीय उलथापालथ सुरू असल्याने, नेमके मुश्रीफ यांच्या कागल मतदार संघातील सामान्य मतदारांना काय वाटते lते जाणून घेऊयात. राष्ट्रवादीच्या पोस्टरवरून शरद पवार गायब : कोल्हापुरातील व्हिनस कॉर्नर चौकात अजित पवार यांची उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र या पोस्टरवर शरद पवार यांचा फोटो नाही. त्यामुळे भर चौकात लागलेल्या पोस्टरने येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांचे लक्ष वेधले आहे. समरजीत घाटगेंच्या भूमिकेबाबत संभ्रमावस्था कायम : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे नूतन कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांनी अजित पवारांसह राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला समर्थन दिल्याने, भारतीय जनता पक्षाचे कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांची मात्र चांगलीच गोची झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून घाटगे नॉट रिचेबल आहेत. समरजीत घाटगे भाजपमधून बाहेर पडणार अशा चर्चांनाही उधान आले आहे, मात्र घाटगे यांच्या भूमिकेबाबत संभ्रमावस्था कायम आहे.