Jalna Accident: मॉलमधून घरी येताना दुचाकीस्वाराला चारचाकीने चिरडले; तीन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू - जालन्यात आयशरने दुचाकीला चिरडले
जालना : शहरातील अंबड चौफुली ते मंठा चौफुली दरम्यान असलेल्या रेल्वे उड्डाण पुलाजवळ आयशर आणि दुचाकीचा अपघात झाला. ओव्हरटेक करताना आयशरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत तीन मुलांचा जागीचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारची सुट्टी असल्याने सय्यद शोएब हे तट्टूपुरा मुजाहेद चौक येथील रहिवासी आहेत. ते आपली मुलगी आणि दोन भाच्यांना घेऊन डी मार्टमध्ये खरेदीसाठी गेले होते. खरेदी करुन परत येत असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. दुचाकीच्या पेट्रोल टाकीवर मुलगी आणि मागे दोन मुले बसले होते. सय्यद शोएब यांची दुचाकी मंठा चौफुली दरम्यान असलेल्या रेल्वे उड्डाण पुलाजवळ आली असताना टेम्पो ओव्हरटेक करत होता. त्यावेळ टेम्पोची जोरदार धडक दुचाकीला लागली. यात नुरैन शेख(वय 7 वर्षे), आदीबा फातेमा सय्यद शोएब(वय 5 वर्षे), आयेजा फातेमा शेख(वय 5 वर्षे) या चिमुरड्यांचा मृत्यू झाला. दरम्यान टेम्पो चालक अपघात स्थळाहून फरार झाला आहे. सय्यद शोऐब हे किरकोळ जखमी असून त्यांच्यावर जालन्यातील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. तीन चिमुकल्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.