टँकर चालकांच्या आंदोलनाचे जळगावात पडसाद; पंपावर लागले पेट्रोल शिल्लक नसल्याचे बोर्ड - शिल्लक नसल्याचे बोर्ड
Published : Jan 2, 2024, 4:23 PM IST
जळगाव Tanker Drivers Strike : अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेल्यास 10 वर्षे कारावास आणि 5 लाख रुपये दंडाची तरतूद नव्या कायद्यात केली आहे. केंद्र सरकारनं लागू केलेल्या या नवीन कायद्याच्या विरोधात राज्यभरात धावणाऱ्या दोन हजारांहून अधिक टँकर, ट्रक चालकांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. नव्या कायद्याला मालट्रक, टँकर चालक-मालक संघटनेनं विरोध दर्शवला आहे. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. टँकर चालकांचे राज्यभरात संप सुरू असून या संपाचा परिणाम जळगाव जिल्ह्यात सुद्धा झाल्याचा पाहायला मिळत आहे. पेट्रोल पंप बंद राहणार असल्याच्या सोशल मीडियावरील चर्चेमुळे मध्यरात्री जळगावातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांची तुफान गर्दी झाली होती. या सर्व वाहनधारकांना पेट्रोल व डिझेलचा पुरवठा केल्यामुळं दुसऱ्या दिवशी या पेट्रोल पंपावरील पेट्रोल डिझेलचा साठा संपला असून या ठिकाणी पेट्रोल शिल्लक नसल्याचा बोर्ड लावण्यात आला आहे.