Indian Coast Guard : चीनी नागरिकाला अरबी समुद्रात हृदयविकाराचा झटका, भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी दिले जीवदान - हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट
मुंबई : अरबी समुद्रात चीनी नागरिकाला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे खळबळ उडाली होती. या चीनी नागरिकाच्या मदतीला धावत भारतीय सैनिकांनी त्याला जीवदान दिल्याची घटना बुधवारी रात्री घडली. भारतीय सैनिकांनी या चीनी नागरिकाला पनामा संशोधन जहाजातून बाहेर काढल्याची माहिती भारतीय तटरक्षक दलाने वृत्तसंस्थेला गुरुवारी दिली आहे. मुंबईपासून 200 किमी अंतरावर असलेल्या एम व्ही डाँग फँग टॅन क्रमांक दोनवरील एका चीनी व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मुंबईतील सागरी बचाव समन्वय केंद्राला मिळाली होती. त्या व्यक्तीला तात्काळ वैद्यकीय मदतीची गरज असल्याची माहिती यावेळी देण्यात आली होती. त्यामुळे चीन ते यूएईच्या मार्गावर जाणाऱ्या जहाजासोबत तात्काळ संपर्क करुन त्यांना टेलीमेडिसीन सल्ला देण्यात आला. आव्हानात्मक परिस्थितीत चीनी नागरिकाला वैद्यकीय मदत करुन हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट करुन त्याला प्राथमिक उपचार करण्यात आले.