Nandurbar Heavy Rain: जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; शेताला तलावाचे स्वरूप, 'या' पाच गावांचा संपर्क तुटला - बस सेवा बंद करण्यात आली
नंदुरबार : गेल्या दोन-तीन दिवसापासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तळोदा व अक्कलकुवा तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. तालुक्यातील दोन गावातील घरे पाण्याखाली गेली आहेत. सोरापाडा, अलीविहीर, मौलीपाडा, इच्छागव्हाण, सिंगपूर शिर्वे या गावाचा संपर्क तुटला आहे. तसेच अनेक शेतात पाणी शिरले आहे. तर तळोदा तालुक्यातील सोरापाडा गावात पाणी शिरल्याने रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तसेच ग्रामीण भागातील वाहतूक ठप्प झाली आहे. बससेवा बंद करण्यात आली आहे. रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असल्याने, अक्कलकुव्यातील सिंगपूर बुद्रूक गावाच्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे. मुसळधार पावसाने शेताला तलावाचे स्वरूप आले आहे. तर अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातही रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने, अनेक घरांची पडझड झाली आहे. पडझड झालेल्या घरातील कुटुंबीयांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.