Guinness World Records : सॅक्सोफोन वाजवून गर्भवती महिलेनं कोरलं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव - सुब्बलक्ष्मी
Published : Sep 18, 2023, 7:11 PM IST
बंगळुरूGuinness World Records : एका 7 महिन्यांच्या गर्भवती महिलेनं सलग 26 तास सॅक्सोफोन वाजवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव कोरलंय. बंगळुरू ग्रामीण जिल्ह्यातील होस्कोटेजवळील अवलहल्ली येथील रहिवासी असलेल्या सुब्बलक्ष्मी असं या महिलेचं नाव आहे. गेल्या फेब्रुवारीमध्ये अवलहल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात तिनं 26 तास 23 मिनिटं सॅक्सोफोन वाजवला होता. एवढा प्रदीर्घ काळ सतत सॅक्सोफोन वाजवणारी पहिली महिला होण्याचा मानही तिनं पटकावला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनं यांची दखल घेत महिलेला पुरस्कारानं सन्मानित केलंय. सुब्बलक्ष्मी तीन महिन्यांची गरोदर असताना तिनं 20 तास सॅक्सोफोन वाजवला होता. मात्र त्यावेळी तिची गिनीज रेकॉर्डमध्ये नाव कोरण्याची संधी हुकली होती. त्यानंतर तिनं 7 महिन्यांची गर्भवती असताना पुन्हा प्रयत्न करत 26 तास सॅक्सोफोन वाजवला. सुब्बलक्ष्मी कन्नड, इंग्रजी, हिंदी, तेलुगूसह 109 हून अधिक भाषांमध्ये सॅक्सोफोन वाजवू शकते. तिनं यापूर्वीही देशाच्या विविध भागात अनेक कार्यक्रम केले आहेत. सुब्बलक्ष्मी यांनी सांगितलं की, मी वयाच्या 13 व्या वर्षी सॅक्सोफोन वाजवायला सुरुवात केली. मी गेल्या 27 वर्षांपासून सॅक्सोफोन वाजवत आहे.