Raosaheb Danve : मोदी सरकारच्या काळात रेल्वेला 'अच्छे दिन' - रावसाहेब दानवे - रावसाहेब दानवे
नंदुरबार : रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी अमृत भारत स्थानक योजना राबविण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच या योजनेचे लोकार्पण करण्यात आले आहे. या योजनेत भुसावळ-सुरत रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असलेले नंदुरबार रेल्वे स्थानक वगळून राज्यातील ४४ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. गुजरात, महाराष्ट्राला जोडणाऱ्या ताप्ती रेल्वे महामार्गाच्या दुहेरी कामाची केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी पाहणी केली. या मार्गाचे दुहेरीकरण करण्यात आलं आहे. लवकरच तिहेरीकरण करण्यात येणार असल्याचे दानवे यांनी म्हटले. यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून विविध मागण्यांचे निवेदन रेल्वेमंत्र्यांना देण्यात आले.
रेल्वेला अच्छे दिन -देशात मोदी सरकार आल्यापासून महाराष्ट्रात मोठा बदल झाला आहे. रेल्वे बजेटमध्ये मोठी वाढ करून कामाचा अनुशेष दूर केला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या पाचोरा, जामनेर मार्गावर नवीन लाईन टाकण्यात येणार आहे. यासोबतच कोल्हापूर ते तुळजापूर, नगर ते बीड, परळी या मार्गावरील कामाला गती मिळणार आहे. सरकार बदलल्याने भूसंपादनाचाही मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे मोदी सरकारच्या काळात रेल्वेला अच्छे दिन आल्याचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.