Ganeshotsav २०२३ : 'लालबाग राजा'च्या दर्शनाला विदेशी पाहुण्यांची गर्दी, पाच किलोमीटरपर्यंत लागल्या रांगा - गणेश चतुर्थी
Published : Sep 19, 2023, 10:51 AM IST
मुंबई : Ganeshotsav २०२३ : मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. गणेश चतुर्थीच्या निमित्तानं तर भाविकांनी काल सायंकाळपासूनच लालबागमध्ये तळ ठोकला होता. आज सकाळी पाच वाजता लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर भाविकांना राजाचं दर्शन खुलं करण्यात आलं. यावेळी विदेशी पाहुण्यांनी देखील मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आज सकाळी तब्बल पाच किलोमीटरहून अधिक लांब रांग पाहायला मिळाली. लालबागच्या राजाची ख्याती नवसाला पावणारा गणपती म्हणून आहे. राज्यासह देशातील अनेक बडे राजकीय नेते आणि फिल्म सेलिब्रिटी देखील लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होतात. यंदा देखील गणेशोत्सवाच्या काळात राजाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येनं भाविक येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर लालबाग तसेच आजूबाजूच्या परिसरात पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त करण्यात आलाय.