पुण्यात हंगामातील आंब्याची पहिली पेटी दाखल; मिळाला 'एवढा' भाव
Published : Jan 18, 2024, 1:47 PM IST
पुणे :फळांचा राजा अशी ओळख असलेला आंबा हा बाजारात कधी दाखल होणार याची उत्सुकता सर्वांनाच असते. लोक वर्षभर आंब्याची वाट पाहत असतात. अशातच यंदाच्या हंगामातील आंब्याची पहिली पेटी ही पुण्यातील मार्केटयार्ड येथे दाखल झाली आहे. पहिल्या मानाच्या 4 डझन आंब्याच्या पेटीची किंमत 21 हजार रुपये इतकी आहे. म्हणजेच एका आंब्याची किंमत जवळपास 440 रुपये आहे. पिकलेला आंबा हा दरवर्षी एप्रिल मध्ये बाजारपेठेत विक्रीसाठी येतो. परंतु पुणे शहरात या हंगामातील आंब्याची पहिली पेटी आज दाखल झाली. या पहिल्या मानाच्या आंब्याच्या पेटीची किंमत 21,000 रुपये होती. मार्केट यार्डमध्ये हंगामातील पहिला आंबा दाखल होताच त्याची विधीवत पूजा आज पार पडली. यंदा एक महिना आधीच आंब्याची पहिली पेटी मार्केटमध्ये दाखल झाली आहे. आंब्याला पूरक वातावरण असल्याने आंबा पेटी दाखल झाली आहे. रत्नागिरी येथील पावस भागातील शेतकरी सुनील यांनी मार्केट यार्डमधील व्यापारी किशोर लडकत यांच्या गाळ्यावर हा रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी आणली होती. या पेटीची पूजा करून त्याच लिलाव करण्यात आला आहे.