बदलापूर एमआयडीसीत केमीकल कंपनीमध्ये भीषण स्फोट; एका कामगाराचा मृत्यू, चार ते पाच जण गंभीर जखमी - केमीकल कंपनी
Published : Jan 18, 2024, 10:50 AM IST
ठाणे Fire in Badlapur MIDC :ठाणे जिल्हयातील बदलापूर शहरातील खरवई एमआयडीसीत एका केमिकल कंपनीला आज पहाटेच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना समोर आलीय. या आगीमुळं कंपनीमध्ये चार ते पाच मोठे स्फोट होऊन त्यात चार ते पाच कामगार जखमी झाले. तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलीय. बदलापूर शहरातील खरवई एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीत आज पहाटे साडेचारच्या सुमारास अचानक स्फोटाचे हादरे बसले. हे हादरे 4 ते 5 किलोमीटर लांब जाणवले. या स्फोटात पाच कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या कंपनीच्या बाहेर तीन टेम्पो उभे होते. या टेम्पोमधील केमिकलमध्ये प्रथम आग लागली. त्यानंतर ही आग कंपनीमध्ये पसरली असं कंपनीतील कामगारांचं म्हणणं आहे. या आगीची माहिती मिळताच बदलापूर, अंबरनाथ, आनंद नगर एमआयडीसी, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अशा एकूण 8 ते 9 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर अडीच तासात या भीषण आगीवर नियंत्रण मिळवलं असून आता या ठिकाणी कुलींगचं काम सुरू आहे. दरम्यान या भीषण आगीमुळे कंपनीच्या लगत असलेल्या दोन कंपन्याही आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यानं दिलीय.