Shirdi Fire News : शिर्डीतील हॉटेल हरिप्रसादला भीषण आग; मोठा अनर्थ टाळला - Hotel Hariprasad Fire Shirdi
अहमदनगर: शिर्डीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हॉटेल हरिप्रसादला आज (रविवारी) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिर्डी अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवीतहानी झाली नाही.
किचनचे मोठ्या प्रमाणात नुकसान: माहितीनुसार, हॉटेल हरिप्रसादच्या किचनच्या बॉयलरला ही आग लागली. आग इतकी भीषण होती की, बॉयरलमधून आगीचे आणि धुराचे लोळ बाहेर येत होते. हाकेच्या अंतरावर असलेल्या शिर्डी नगरपंचायतच्या अग्निशामक दलाच्या जवानांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली; मात्र या आगीत हॉटेलच्या किचनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच हॉटेलच्या खाली असलेल्या जनरल स्टोअर्स आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्स या दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
'या' कारणाने लागली आग: हरिप्रसाद हॉटेलच्या किचनमधील उष्ण हवा बाहेर काढण्यासाठी बसवण्यात आलेल्या बॉयलरमध्ये तेलाचे मोठे थर साचलेले असल्याने ही आग लागली असल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमल्याने काही काळ नगर-मनमाड महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यानंतर शिर्डी वाहतूक शाखेचे अधिकारी यांनी घटनास्थळी येत वाहतूक सुरळीत केली.
हेही वाचा: Atiq Ashraf Murder Case : उमेश पाल हत्याकांडाप्रमाणेच अतिक-अश्रफ हत्याकांड; 'ही' आहेत साम्ये