आगळावेगळा निरोप समारंभ; दहा वर्षे सेवा देणाऱ्या ग्रेसी, सिंबा श्वानांना निरोप - दहा वर्षे सेवा
Published : Dec 27, 2023, 3:16 PM IST
चंद्रपूर :पोलीस दलात नेहमी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल निरोप दिला जातो. मात्र चंद्रपूरमध्ये पहिल्यांदाच एक आगळावेगळा निरोप समारंभ झाला. तब्बल दहा वर्षे सेवा देणाऱ्या दोन श्वानांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. ग्रेसी आणि सिम्बा या दोन श्वानांना जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत निरोप देण्यात आला. मोठ्या दिमाखदार पद्धतीने हा सोहळा पार पडला. यावेळी निवृत्त होणाऱ्या ग्रेसी आणि सिंबा या सत्कारमूर्तींचा शाल आणि पुष्पहार घालून त्याचप्रमाणे मानाची झूल घालून सत्कार करण्यात आला. अनेकांसाठी हा भावूक क्षण होता. ग्रेसी आणि सिम्बाला निरोप देताना पोलीस दलात सक्रिय असलेले इतर श्वान देखील उपस्थित होते. यामध्ये पवन, हरी, अर्जुन, मंगल, बोल्ट, मेरी, व्हिक्टर, मेस्सी आणि नुकतेच चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या शानपथकात दाखल झालेले रियो आणि कोको हे हजर होते.