Shailaja Darade Arrest : परिक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडेंना अटक; नोकरीचे आमिष दाखवून करोडोंची फसवणूक
पुणे : शिक्षण विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 44 जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या आरोपावरून दाखल असलेल्या गुन्ह्यात हडपसर पोलिसांनी अखेर सहा महिन्यानंतर राज्य परिक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे (रा. रेव्हेरायीन ग्रीन्स, पाषाण, सुसरोड) यांना अटक केली आहे. मंगळवारी शैलजा दराडे यांना चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण -गेल्या काही महिन्यांपासून दराडे यांच्याकडे याबाबत चौकशी सुरू होती. सोमवारी त्यांना चौकशीसाठी हडपसर पोलिसांनी बोलावले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वी त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर) याला अटक करण्यात आली होती. दोघांवर हडपसर पोलीस ठाण्यात संगनमत करून फसवणूक व अपहार केल्याचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पोपट सुखदेव सुर्यवंशी (50, रा. मु. पो. खानजोडवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.
करोडोंची फसवणूक- शैलजा दराडें यांच्याआधी शिक्षण परिषदेचे अध्यक्ष असलेले तुकाराम सुपे यांनाही टीईटी घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर शिक्षण परिषदेचा कारभार शैलजा दराडेंकडे सोपवण्यात आला होता. मात्र, शिक्षकांना नोकरी लावण्याच्या बहाण्याने दराडे यांनी लाखो रुपये प्रत्येकाकडून जमा केले होते. ही रक्कम पाच कोटींच्या घरात होती. असा त्यांच्यावर आरोप होता. त्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली आहे.
हडपसर पोलिसात गुन्हा - सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील पोपट सूर्यवंशी या शिक्षकाकडून त्यांच्या नात्यातील दोन महिला शिक्षकांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून प्रत्येकी 12 आणि 15 लाख रुपये घेतल्याचा आरोप शैलजा दराडेंवर असून, दराडे यांनी हे पैसै त्यांचे भाऊ दादासाहेब दराडे याच्यामार्फत पुण्यातील हडपसर भागात घेतल्याचे तक्रारदार पोपट सुर्यवंशी यांनी म्हटले आहे. पैसै देऊन देखील नोकरी न मिळाल्याने तक्रारदार पोपट सुर्यवंशी यांनी पैसे परत मागितले असता शैलजा दराडे यांनी पैसे परत केले नाहीत. त्यामुळे पोपट सुर्यवंशी यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सहा महिन्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
भाऊ दादासाहेब दराडेमार्फत लाच घेण्याचा आरोप-राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांना काही दिवसांपूर्वीच त्यांना निलंबित करण्यात आले होते. शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या आमिष दाखवत उमेदवारांकडून पैसे घेत नोकरी न लावता फसवणूक केल्याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला होता. डी .एड. झालेल्या शिक्षकांना कायमस्वरूपी नोकरी लावण्यासाठी 12 लाख तर बी. एड. झालेल्या उमेदवारांकडून 14 लाख रुपये शैलजा दराडे या त्यांचा भाऊ दादासाहेब दराडेमार्फत घेत होत्या, असा आरोप आहे.
शैलजा दराडेंना पोलीस कोठडी -शैलजा दराडे यांना चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांना तपासात सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दराडे यांनी कोर्टात दिले आहे.