Maharashtra Day 2023: महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल रमेश बैस यांनी केले ध्वजारोहण
मुंबई :महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी मुंबई उपनगर शहरचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महागरपलिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. आय. एस. चहल, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, निवासी जिल्हाधिकारी सदानंद जाधव उपस्थित होते. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी शिवाजी पार्क येथे ध्वजारोहण केले आहे. यावेळी राज्यपालांनी मराठीतून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पुण्यातील आंबेगावात छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उभारण्यात येईल. शिवनेरीवर शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारीत संग्रहालय केले जाईल. तसेच 2 ते 9 जून 2023 या आठवड्यात शिवराज्य महोत्सव आयोजित करण्याची घोषणा राज्यपालांनी केली. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्याही शुभेच्छा दिल्या. यावेळी राजशिष्टाचार विभाग, महानगर पालिका, पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करून जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय समारंभ नागपूरमध्ये कस्तुरचंद पार्कवर आयोजित करण्यात आला होता.