Diwali Festival २०२३ : सिंगापुरमधील आदिवासींची दिवाळी झाली संस्मरणीय; पाहा व्हिडिओ - Durgam Pratishthan
Published : Oct 31, 2023, 10:51 PM IST
पुणे Diwali Festival 2023 : नागरी वस्त्यांसारख्या सोयी-सुविधांपासून वंचित, दुर्गम भागातील आदिवासींची दिवाळी (Tribal Diwali) गोड व्हावी, त्यांनाही दिवाळी सण (Diwali 2023) उत्साहाने साजरा करता यावा, या उद्देशाने पुण्यातील ‘दुर्गम प्रतिष्ठान’ संस्थेच्या (Durgam Pratishthan) वतीनं रायगड आणि तोरणा किल्ल्यांच्या कुशीत वसलेल्या सिंगापूर, एकलगाव आणि मोहरी (ता. वेल्हे) या दुर्गम गावातील ४० आदिवासी कुटुंबांना दिवाळी फराळ, दोन महिन्याचा किराणा व नवीन कपडे असं साहित्य भेट देण्यात आले. या उपक्रमामुळे या गावात दिवाळीचा (Diwali Celebration In Adivasi Pada) उत्साह द्विगुणित झालाय.
जीवनावश्यक वस्तूंचे वाटप : तीनही गावातील ४० कुटुंबांना साखर, तेल, पोहे, रवा, बेसनपीठ, तूप, कडधान्य, डाळी, साबण, चहा पावडर, मसाले आदी दोन महिनाभर पुरेल अशा किराणा मालासह दिवाळी फराळ, ब्लॅंकेट, कानटोपी, आकाश कंदील, बिस्किटे, सुगंधी तेल, साबण, पणती, उटणे, रांगोळी, फटाके, आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. गावातील ३३ महिलांना साड्या, ४२ मुलामुलींना, तसेच ५५ ज्येष्ठ नागरिकांना व पुरुषांना नवीन कपडेही देण्यात आले.