Devendra Fadnavis on Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पुन्हा एकदा गाजर, पाहा देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?
औरंगाबाद : मंत्री मंडळ विस्ताराबाबत अमित शाहांसोबत चर्चा झाली नाही. पण आम्ही लवकरच मंत्री मंडळाचा विस्तार करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्याने त्याबाबत ही आढावा बैठक आहे. प्रत्येक जिल्हा नियोजनसाठी बैठक घेण्यात येत आहे. त्याबाबत निवडणूक आयोगाने परवानगी दिलेली आहे. आढावा घेऊन अर्थसंकल्पात मराठवाड्याला काय देता येईल हे बघू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राजकीय घडामोडींना वेगाने बदलत :सध्या राज्यासह दिल्लीतील राजकीय घडामोडी वेगाने बदलत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. राज्यपाल पदमुक्त, मंत्रिमंडळ विस्तार, सहकार क्षेत्र अशा अनेक विषयांवर यावेळी चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या चर्चेला अजून कुठलाही दुजोरा मिळालेला नाही. यावेळी भाजपचे महाराष्ट्रातील नेते एकत्र आले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पद सोडण्याची इच्छा या विषयावरही चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
मंत्रिमंडळ विस्तार विषय : मंत्रिमंडळ विस्तारावरून देखील महाविकास आघाडी सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत आहे. त्यामुळे सध्या मंत्रिमंडळ विस्तार चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सुतोवाच केले होते. एका मंत्र्यांवर अनेक खात्याची जबाबदारी आहे. अनेक जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची देखील जबाबदारी आहे. विशेषतः अधिवेशन काळात विधानसभा आणि विधानपरिषदेत उत्तर देताना मंत्र्यांची बरीच धावपळ होते. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास चांगलेच होईल, असे एका कार्यक्रमात फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे मंगळवारी दिल्लीवारीत याविषयावर देखील चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
शिंदे गटाला ३ मंत्रीपदे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिंदे गटाला ३ मंत्रीपद मिळण्याच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब झाला आहे. लवकरच होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला तीन मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. परंतु त्यामध्ये किती कॅबिनेट मंत्रीपदे असणार की तीन राज्यमंत्रीपदे असणार याबाबत अजूनही थोडासा संभ्रम आहे. परंतु ही तीन नावे कोणती असतील? याबाबत सर्व अधिकार हे एकनाथ शिंदे यांना असून त्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
बच्चू कडुंचे टोमणे :राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार अशा चर्चा रंगत असल्या तरी अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी यासंदर्भात मोठे विधान केले होते. या सरकारकडून मंत्रिमंडळ विस्ताराच्या अपेक्षा नाही. 2024 पर्यंत काही होणार नाही, असे नाराज उद्गार कडू यांनी मुंबईत ईटीव्ही भारतशी बोलताना काढले होते. त्यामुळे सध्या मंत्रिमंडळ विस्तार हा हॉट विषय बनला आहे.