Gadchiroli News: वीर बाबुराव शेडमाके पुलाचे लोकार्पण; गडचिरोलीतील संपर्क तुटणारी गावे बारमाही रस्त्याने जोडणार- उपमुख्यमंत्री फडणवीस
गडचिरोली: भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात अनेक विकास कामांचे लोकार्पण केले. गडचिरोलीच्या इतिहासात कोठी कोरनार या अतिशय दुर्गम व नक्षलग्रस्त भागात जाणारे देवेंद्र फडणवीस हे पहिलेच वरिष्ठ लोकप्रतिनिधी आहेत. कोठी कोरनार येथे वीर बाबुराव शेडमाके पुलाचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले. पावसाळ्यात संपर्क तुटणारी गावे पूल आणि बारमाही रस्त्याने जोडण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सुरजागड येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी मंचावर अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार देवराव होळी, कृष्णा गजबे, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मिना, पोलीस अधीक्षक निलोत्पल, लॉर्ड्स मेटलचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन आदी उपस्थित होते.