Devendra Fadnavis Criticizes Sharad Pawar : छत्रपती संभाजीनगर नाव शरद पवारांना मान्य नाही, फडणवीसांची पवारांवर टीका
गंगापूर (छत्रपती संभाजी नगर) :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना छत्रपती संभाजीनगर नाव मान्य नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. एका वर्षापूर्वी सत्तेत आलेल्या सरकारने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचे पहिले काम केले. मात्र, शरद पवार यांना छत्रपती संभाजीनगर हे नाव मान्य नाही. पवार म्हणतात तुम्ही नाव काहीही करा, मी औरंगाबादच म्हणेल असे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते, आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथे जलजीवन मिशन योजनेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, तुम्ही कितीही औरंगाबाद म्हणाले, तरी आमच्या हृदयातून छत्रपती संभाजी महाराजांना कोणीही काढू शकत नाही. तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान आम्ही कधीच विसरू शकत नाही. एका वर्षांपूर्वी जनतेच्या आशीर्वादाने सरकार बदलले. या एका वर्षात अनेक विकास कामे झाल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.