Dahi Handi 2023 : दहीहंडी फोडून 21 लाखांचं बक्षीस पटकवणार कोण? - दहीहंडी उत्सवांची जोरदार चर्चा
Published : Sep 7, 2023, 4:31 PM IST
ठाणे Dahi Handi :शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा संघानं पहिल्या अयशस्वी प्रयत्नानंतर ९ थरांची सलामी दिली. तसंच त्यांनी आपला पहिला विक्रम देखील कायम ठेवला. इथंच जय जवान गोविंदा पथक पुन्हा 10 थर लावून विश्वविक्रम करण्याच्या तयारीत आहे. आज दहीहंडी सणासाठी सकाळपासूनच वरुणराजा गोविंदाच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. पावसाच्या सरी अंगावर घेत गोविंदा पथक थर रचण्याचा प्रयत्न करीत आहेत. ठाण्यात सध्या पाच दहीहंडी उत्सवांची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात टेंभीनाका येथील दिघे साहेबांची हंडी, खासदार राजन विचारे यांची जांबळी नाका येथील हंडी, यात आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचा समावेश आहे. कोणते मंडळ जास्तीत जास्त थर रचून विश्वविक्रम मोडणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. दोन वर्षांपूर्वी जय जवान दहीहंडी उत्सव मंडळानं प्रताप सरनाईक यांच्या दहीहंडी उत्सवात दहा थर लावून विश्वविक्रम केला होता. मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या दहीहंडी उत्सवात शिवसमृद्धी सोसायटीच्या गोविंदा पथकानं प्रथम सात थरांनी सलामी दिली. त्यानंतर सूर्योदय गोविंदा पथकानं सहा थर लावून सलामी दिली. ही दहीहंडी फोडून 21 लाखांचं बक्षीस कोण पटकवणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.